ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 12 - सरकारने कर्जमाफी दिली असून, आता आंदोलन करू नका, तसेच मुंबईप्रमाणेच आदर्श घोटाळा बुलडाण्यात करू नका, अशी मागणी करण्याकरिता जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले व भाजपाचे अन्य पदाधिकारी काँग्रेस कार्यालयाजवळ गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात बराच तणाव निर्माण झाला होता.
बुधवारी (12 जुलै ) दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू होती. सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर एल्गार पुकारणार आहे. या आंदोलनाची सुरूवात बुलडाण्यातून होणार असून, त्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोकराव चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे बुलडाण्यात आलेत.
कार्यक्रम सुरू होण्याला काही अवधी असतानाच भाजपाच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, भाजपाचे तालुकाध्यक्ष मोहन पवार, शहराध्यक्ष महिला आघाडी विजया राठी काँग्रेस कार्यालयाबाहेर गेल्या. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सरकार मुर्दाबाद अशी घोषणाबाजी सुरू होती. आमदार हर्षवर्धन सपकाळ तेथे दाखल झाल्यानंतर तणाव कमी झाला. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी श्वेता महाले यांनी मंगळसूत्र तोडल्याचा आरोपही केला.