खामगाव - शहराच्या विविध भागांतून चोरी गेलेल्या ११ दुचाकींचा शोध लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.शहरातील आठवडी बाजार, बसस्थानक, अग्रसेन चौक, महावीर चौक, जलंब नाका, शेगाव रोड, घाटपुरी नाका, घाटपुरी रोड तसेच बाजारातून दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. शहरातील ११ दुचाकी चोरीप्रकरणी विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा ११ दुचाकी चोरीचा छडा लावण्यात उपविभागीय पथकाला यश आले आहे. यामध्ये चार आरोपींसोबतच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर शहरातील विविध ठिकाणांहून ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. यात शेगाव येथील महेंद्र नेमीचंद शर्मा (२२) अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आशुतोष सुरेश भुयारकर (२२), रा. व्यंकटेशनगर, सुजल निरंजन शर्मा (२२), रा. निर्मलनगर, शे. इम्रान शे. मुबारक रा. कंझारा यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेल्या ११ दुचाकी शेगाव, अकोला, अकोट, नागपूर आणि कंझारा येथून जप्त केल्या. यात शहरातील दोन दुचाकींचा समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही कारवाई केली.