- संदीप वानखडे बुलढाणा - निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शेळ्यांच्या अंगावर वीज काेसळली़ यामध्ये १६ शेळ्या जागीच ठार झाल्या़ ही घटना ३० एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता घडली. यामध्ये पशुपालक भिकाजी सखाराम जाधव यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, दाेघांनी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली आश्रय घेतल्याने ते सुदैवाने बचावले.
रताळी येथील शशिकला तेजराव आव्हाळे व शेतमालक भिकाजी सखाराम जाधव यांनी रविवारी सकाळी ९ वाजता शेळ्यांचा चरण्यासाठी साेडले हाेते़ त्याचवेळी अचानक अवकाळी पाउस सुरू झाला़ त्यामुळे, सर्व शेळ्या निंबाच्या झाडाखाली थांबल्या़ पावसादरम्यान वीज झाडावर काेसळल्याने १६ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला़ या घटनेत जाधव यांचे दाेन लाख रुपयांचे नुकसान झाले़ माहिती मिळताच तलाठी शेळके व पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला़ या घटनेत नुकसान झालेल्या जाधव यांना शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी सरपंच उषा समाधान पाटील यांनी केली आहे.