- दिनेश पठाडे बुलढाणा - जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज, शनिवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिरात घेतली जाणार आहे.
पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण ८ हजार ५३१ आवेदन अर्ज प्राप्त झाले. यांतील ५ हजार ९६० उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. १९ जून ते १ जुलै या दरम्यान उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ५० टक्के गुण घेऊन ३ हजार ३४२ उमेदवार उत्तीर्ण झाले. रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात एकूण १ हजार ३६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. ही निवड यादी पोलिस दलाच्या जिल्हा संकेतस्थळ, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची आज, शनिवारी लेखी परीक्षा होणार असून त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने घेणार हजेरीजिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी तीन तास अगोदर म्हणजेच सकाळी सात वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेशपत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे. परीक्षेवर गोपनीय यंत्रणा ठेवणार नजरलेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे.