- नीलेश जोशी बुलढाणा - मलकापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे उड्डामपुलाजवळ दोन खासगी प्रवाशी बसच्या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्याकडून त्यांनी अपघाताची सविस्तर माहिती घेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
२९ जुलै रोजी पहाटे तीन वाजता झालेल्या या अपघातामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनाही त्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्यासोबत डॉ. प्रशांत पाटील, बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.