बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २३ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ असल्याने जिल्ह्यातील ५ हजार १६० ऑटोचालकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावला आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.देश व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातही कोरोना बाधितांचा आकडा १७ झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी घोषित केली आहे. त्यामुळे रेल्वे, बस, विमानसेवा बंद आहेत. प्रवाशीच नसल्याने आॅटोची चाकेही थांबली आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांवर एकही आॅटो फिरतांना दिसत नाही. आॅटो व्यवसायावरच चालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे. दिवसाला एक आॅटो चालक ५०० ते ८०० रुपये कमवतो. मुलांचे शिक्षण, दवाखाना, किराणा, बाजार व इतर खर्च यामधून भागतो. संचारबंदीमुळे आॅटो बंद असल्याने कुटूंब कसे चालवावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ऑटोचालक विद्यार्थी वाहतूक करतात. मात्र शाळाही बंद असल्याने त्यांच्यावर बेरोजगारी आली आहे. प्रवासी ऑटोरिक्षांची चाके थांबलेली असल्याने आवक बंद झाली आहे. गेल्या २३ दिवसांपासून ऑटोघरासमोर उभे आहेत. बहुतेक चालकांकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. घरातील इतर सदस्य कमावते नाहीत. येणारा पैसाच थांबल्याने गृहिणींना पेच पडला आहे.