- सदानंद सिरसाटबुलढाणा - संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तामगाव पोलिसात १५ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकरणाच्या दाखल तक्रारीनुसार आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
एका गावातील पीडिता दुपारी राॅकेल आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी घरी येताना रस्त्यावर ओळखीचा सय्यद नाजीम नावाचा व्यक्ती उभा होता. त्याने तिला बोलाविले. तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या पाठोपाठ खोलीत गेली. त्यावेळी त्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व कुणाला काही सांगितल्यास मारून टाकेल, अशी धमकी दिली. तीने ही घटना आईला सांगितली. वडील घरी आल्यावर आई-वडिलांसह पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंके यांनी केला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात पीडिता, तिची आई व इतर साक्षीदार फितूर झाले.
सरकारी वकिलांच्या उलट तपासणीदरम्यान साक्षीदारांवर दबाव असणे, तसेच घटनेनंतर फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना लोकांनी गावाबाहेर काढल्याने ते दुसऱ्या गावात गेले. तसेच या घटनेमुळे फिर्यादी हिचे लग्न ठरत नाही, अशा बाबी पुराव्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी भूपेंद्र पाटील यांची साक्ष, तसेच महिला पोलिस कविता इंगळे, महिला दक्षता समितीच्या सदस्या नंदा सोनोने, पोलिस अधिकारी बी. आर. गिते याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांचा पुरावा आणि शासकीय अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कलाम यास आजन्म सश्रम कारावासाची उर्वरित संपूर्ण आयुष्यभरासाठी सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुद्धा आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. रजनी बावस्कार भालेराव यांनी काम पाहिले. कोर्ट मोहरर पोलिस अमर कस्तुरे यांनी सहकार्य केले.