खामगाव : आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही शेतीचे नाममात्र खरेदीखत केल्याप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली असून, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील जळका तेली येथील नरेंद्र शंकरलाल गुप्ता यांनी प्रदीप मुरलीधर बोबडे यांच्याकडून आर्थिक अडचणीमुळे ३० हजार रुपये घेतले. या व्यवहारानुसार प्रदीप बोबडे यांनी गुप्ता यांची जळका तेली शिवारातील गट क्रमांक ३९ क्षेत्र २ हेक्टर ३३ आर ही नाममात्र खरेदी केली.
तर दुस-यांदा घेतलेल्या ४० हजाराच्या गट क्रमांक ३९ क्षेत्र १ हेक्टर २१ आर या शेतीची नाममात्र दरात खरेदी केली. आर्थिक अडचणीतून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही नरेंद्र गुप्ता यांच्या शेतीची परस्पर सौदाचिठ्ठी करण्यात आली. ही शेती मनिषा कैलास ढाकरे आणि यमुनाबाई शिवचरण चरपेयांनी १४ नोव्हेंबर २०१८ पूर्वी खरेदी केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्या चौकशी अहवालावरून अनिल सखाराम शास्त्री(४७) सहकारी अधिकारी श्रेणी सहा. निबंधक खामगाव यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी प्रदीप मुरलीधर बोबडे , मनिषा ढाकरे, यमुनाबाई चरपे यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला. सावकारी कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संमती न घेता शेतीच्या व्यवहाराप्रकरणी तिघांविरोधात सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल प्राप्त असून, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.- रफीक शेख पोलीस निरिक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन खामगाव.