- अनिल गवई खामगाव - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतीकारी नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवित, खामगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आसूड आंदोलन केले.
स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत आंदोलनाला सुरूवात केली आहे. या आंदोलनात बुधवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने आसूड आंदोलन करण्यात आले. शासन आणि प्रशासन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून वारंवार मराठा समाजातील गोर गरीब बांधवांवर आसूड ओढत आहे. या आसूडामुळे मराठा समाजातील मुला बाळाचे आयुष्य बरबाद होत असल्याचे, शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी बुधवारी सायंकाळी आसूड आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी सकल मराठा समाज बांधव व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दोन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावलीमराठा समाजाचे क्रांतीकारी नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने २९ ऑक्टोबरपासून बेमुदत व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. बेमुदत उपोषणात प्रविण कदम, शंकर खराडे, शिवाजी जाधव, शेलोडीचे माजी सरपंच संतोष येवले, कडूचंद घाडगे यांचा सहभाग असून, बुधवारी सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी उपोषण कर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी संतोष येवले आणि कडूचंद घाडगे यांची प्रकृती खालावल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यांना त्वरीत दुपारी सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.