सिंदखेडराजा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे खाजगी बसला भीषण अपघात झाल्याने 25 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना आज पहाटे समृद्धी महामार्गावर घडली. हा अपघात एवढा भीषण होता की बसला आग लागल्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात स्थळी विभागीय आयुक्त निधी पांडे, पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती जयंत नाईकनवरे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ.एच.जी. तूम्मोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी भेट देऊन पाहणी केली.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.