बुलढाणा : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे, असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर,अपघात झाल्यानंतर त्याठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या होत्या. मात्र, बसने मोठा पेट घेतल्याने प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळं वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवाशांना सुरक्षितस्थळी नेणे ही वाहनचालकांची जबाबदारी असते. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बस विदर्भ ट्रॅव्हल्सची विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.