- नीलेश जोशी बुलढाणा - जालना- चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला पुणे-शेगाव बसची धडक बसून अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. आंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडला. जखमी पैकी दोघे गंभीर आहेत. सर्व जखमींना चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यावरून शेगावला ही बस जात होती.
रामनगर फाट्याजवळ साखरेचे पोते भरलेल्या ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात भरधाव बसने ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिली. ट्रक अचानक लेन सोडून आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व गंभीर जख्मी प्रवाशांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी प्रवाशांना चिखली येथील खाजगी हाॕस्पीटलमध्ये भरती केले आहे. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी फोडून एका बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच आंचरवाडी,रामनगर,मेरा खुर्द येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढत उपचारासाठी चिखली येथे पाठवले. यावेळी पीएसआय हरिहर गोरे व गोरख राठोड,मोंरसिंग राठोड, अरुण खार्डे, रामेश्वर आंधळे,हे कर्मचारी हजर होते.