जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गाव चारबनच्या विद्यार्थ्यांसोबत वाद्यवृंदावर ताल धरला. निमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य असल्याने जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा चारबन येथे वृक्षारोपण व बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी सुरुवातीला शाळेच्या प्रवेशद्वारावर परंपरागत आदिवासी पोशाखातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यापाठोपाठ आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपारिक आदिवासी स्वागत गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदिवासी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पारंपारिक नृत्य प्रकार आहे. शाळेतील मुलांनी मनमोहक आदिवासी नृत्य प्रकार सादर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व अधिकाऱ्यांनीही त्या वाद्यावर ताल धरला. त्यामुळे शिक्षकवृंदांसह आसन सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी चारबन शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे, दीपक उमाळे, माधव मोसंबे, ममता गावित यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख केशरसिंह राऊत, चारबन शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
अन्.. जिल्हाधिकारी थिरकले आदिवासी विद्यार्थ्यांसोबत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 11:56 AM