बुलडाणा: बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ अतिवृष्टीमुळे वाताहत झालेल्या सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही माहिती दिली.पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली. आपत्तीतून सावरण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. परंतू तेवढ्या मदतीने तेथील लोकांना सावरणे शक्य नाही. समाजातून मोठ्या प्रमाणात हातभार लागणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ यांनी तातडीची सभा बोलावून या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बेलवडी, वसवडे, ब्रम्हनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे. पुनर्वसनाचे काम येत्या दोन ते तीन दिवसात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनात सुरु होईल. या कामात जास्तीत जास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व रोख स्वरुपात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीची रक्कम महाराष्ट्र राज्य फेडरेशन किंवा बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी संस्थांचे फेडरेशन यांच्याकडे पाठवावी, असे आवाहन बुलडाणा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. या सभेस अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्षा स्वाती वाकेकर, मानद सचिव सुरेंद्र पांडे, संचालक अॅड. मंगेश व्यवहारे, देवानंद कायंदे, पंडीतराव देशमुख, शाम नसवाले, गोविंद मापारी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:53 AM