बुलडाणा : मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. अनुसूचित जमातीचे (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात याकरिता समस्त धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजास आरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ नुसार केलेला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतू राज्य शासनाने यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याने धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. न्याय मागण्यांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. परंतू राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताच कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजस आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी बारामती येथे केली होती. मात्र सरकार सत्तेवर येऊन जवळपास चार वर्ष लोटली तरीही आरक्षणाच्या संदर्भात ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. त्याअनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात करण्यात आले.
महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या धनगर समाजाच्या धरणे आंदोलनात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील महिलांनी सकाळपासूनच आंदोलनस्थळी हजेरी लावली. पावसाचे वातावरण असतानाही मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी येळकोट, येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणा दिल्या.
भजनी मंडळांचा सहभाग
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी सुुरु असलेल्या धरणे आंदोलनात समाजातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला. एकापेक्षा एक भजन सादर करुन भजनी मंडळांनी आंदोलनात रंगत आणली. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी भजने सादर करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तबला, पेटी, खंजेरीच्या आवाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संगितमय झाला होता.