बुलढाणा : येथील तालुका क्रीडा संकुलावर २२ ऑगस्टपासून जिल्हास्तरीय आर्चरी क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील धनुर्विद्या खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात येत आहेत.
१४, १७, १९ वर्षांआतील मुले-मुलींची जिल्हास्तर शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धा २२ ते २३ ऑगस्ट दोन दिवस तालुका क्रीडा संकुल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २२ ऑगस्ट आर्चरी संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, ॲड. उदय कारंजकर, दिगंबर पाटील, मनीषा वारे यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर प्रा. डॉ. मनोज व्यवहारे यांच्या उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
मैदानाचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. स्पर्धेकरिता मुख्य पंच म्हणून प्रणीत देशमुख यांनी तर नागेश निंबाळकर, विनया नारनवरे, अभिषेक पिसाळ, अजित श्रीराम यांनी पंच म्हणून काम पाहिले. उद्धाटन कार्यक्रमास डॉ. प्रविण नरवाडे, नितीन अघाव, अंकुश बोराडे, संतोष शिंदे, प्रदीप शिंगणे, भरत ओळेकर, सागर उबाळे, पवार उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले.