चिखली (जि. बुलडाणा) : एैन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात वीज वितरण केंद्रातील साहित्याची जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी त्यांच्यासह नऊ जणांना बुधवारी दुपारी अटक केली. दरम्यान, सध्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील जांबूळधाबा येथील वीज वितरणच्या कार्यालयात जाळपोळ केल्या प्रकरणीही मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरिश रावळ यांच्यासह दहा जणांना बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्त्वात चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक मदन यांनी आ. राहूल बोंद्रे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत चिखली न्यायालयात हजर केले आहे. आ. राहूल बोंद्र यांना अटक करण्यात आल्याची वार्ता पसरताच त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी राहत्या घरासह परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य आणि सतर्कतेच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी दंगाकाबू पथकही तैनात केले होते. दरम्यान, चिखली न्यायालयात आ. राहूल बोंद्रे यांना सध्या हजर करण्यात आले असून परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यात दहशत निर्माण केल्या प्रकरणी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले गेले आहेत. न्यायालयात आ. राहूल बोंद्रे यांची बाजू अॅड. सतिश गवई व त्यांच्या एका सहकार्याने मांडली.
का झाली अटक?
चिखली तालुक्यातील केळवद परिसरातील शेतकर्यांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडीत केला होता. त्यामुळे संतप्त शेतकरी आ. राहूल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात केळवद येथील वीज वितरणच्या कार्यालयात सायंकाळी गेले होते. तेथे आक्रमक झालेल्या जमावाने साहित्याची जाळपोळ केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात २७ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आ. राहूल बोंद्रे यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे.
मलकापूरच्या नगराध्यक्षांनाही पोलिस कोठडी
दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राची तोडफोड आणि साहित्याची जाळपोळ केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरिश रावळ व त्यांचे नऊ सहकारी यांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना बुलडाणा न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांची २८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यामध्ये अॅड. रावळ यांच्यासह गजानन ठोसर, राजू पाटील, बंडू चौधरी, विजय पाटील, जाकीर मेमन, जावेद कुरेशी, ज्ञानेश्वर निकम, सुभाष पाटील, देवचंद पाटील, नीलेश चोपडे यांचा यामध्ये समावेश आहे. वादी पक्षातर्फे अॅड. अमोल बल्लाळ यांनी तर आरोपींतर्फे अॅड. जी. डी. पाटील यांनी काम पाहले. २५ डिसेंबर रोजी जांबूळधाबा येथील वीज वितरणचे उपकेंद्रातील साहित्याची जाळपोळ व नुकसान त्यांनी केले होते.