- उद्धव फंगाळ मेहकर : जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. त्यामुळे या यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शॉटसर्किट सह अन्य कारणांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली. मात्र अत्यावश्यक मनुष्यबळच उपलब्ध पाच ते सहा वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मेहकर येथील ही वाहने शोभेची वस्तू बनल्या आहेत. शहरामध्ये तथा ग्रामीण भागात एखाद्या कारणाने आग लागल्यास सदर आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाची उपलब्धता करून देण्यात येते. मात्र सर्व सुविधा असतांनाही केवळ कर्मचाºयांची भरती नसल्याने अग्नीशमनच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. गाडी जर वेळेवर आली नाही तर खाजगी पाण्याचे टॅकर मागवून आग विझवण्यात येते. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून ही आवश्यक मनुष्यबळ का उपलब्ध करून दिले जात नाही, हा प्रश्न आहे. मेहकर पालिकेला अग्नीशमनची नविन गाडी मिळालेली आहे. या गाडीवर ८ कर्मचाºयांची पदे मंजुर आहेत. यामध्ये १ चालक ४ फायरमन, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक पर्यवेक्षक अशी ८ पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र ही यंत्रणा अद्यापही प्रभावीपणे कार्यान्वीत झालेली नाही. त्यामुळे मेहक उपविभागात आपतकालीन स्थितीत मदत कार्यकरण्यात प्रसंगी मोठ्या अडचणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा त्वरेने भरण्यात याव्यात अशी मागणी होत असून खा. प्रतापराव जाधव यांनीही प्रशासनाने प्रकरणी दिरंगाई न करता यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वीत करावी, अशी मागणी केली आहे. अग्नीशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो. या विभागातील रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यासाठी पालिका मुख्याधिकारी यांना सुचना केल्या आहेत.
- डॉ. नीलेश अपार, एसडीओ, मेहकर
अग्नीशमन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच हे कार्य पूर्णत्वास जाईल.
- अशोक सातपुते, मुख्याधिकारी, मेहकर पालिका