- नीलेश जोशी
बुलडाणा: विदर्भ कोआॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन (व्हीसीएएमएस) आणी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयातंर्गत जिल्ह्यात सोयाबीन, मूग व उडीद खरेदी करण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्रांवर आतापर्यंत १९ हजार ६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत जिल्ह्यातील या केंद्रांवर अवघा चार हजार एक क्विंटल माल खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान, अवर्षण सदृश्य स्थितीचाही फटका यंदा बसला असून शेतमालाच्या उत्पादनात घट झाल्याचे चित्र प्राथमिकस्तरावर दृष्टीपथास येत आहे. दुसरीकडे किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार्या सोयाबीन, मूग व उडीद खरेदीला १५ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. एकीकडे जिल्ह्यात अवर्षण सदृश्य स्थिती असताना उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर अद्याप अपेक्षीत अशी गर्दी झालेली नाही. येत्या काळात ही गर्दी होण्याची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसापासून मूग व उडदाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप अपेक्षीत असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अवर्षण सदृश्य स्थितीमुळे उत्पादकतेत घट आल्यानेतर ही गर्दी कमी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता १५ दिवसांची आॅनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढ दिल्याने उशिरा पेरा करणार्यांनाही नोंदणी करणे शक्य होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयातंर्गत देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मोताळा येथे किमान आधारभूत किंमतीतंर्गत धान्य खरेदी केंद्र उघडण्यात आली आहेत तर विदर्भ कोआॅफरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनतंर्गत मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा, चिखली, शेगाव आणि बुलडाणा येथे केंद्र उघडण्यात आले आहे. संग्रामपूर येथे अद्याप ते उघडण्यात आलेले नाही. शेगाव व बुलडाणा येथे गेल्या काही दिवसाअगोदरच ते उघडण्यात आले आहे. मूगासाठी सहा हजार ९७५, उडीदासाठी पाच हजार ६०० आणि सोयाबीनसाठी तीन हजार ३९९ रुपये हमीभाव देण्यात आलेला आहे.
सोयाबीनसाठी साडेसहा हजार नोंदणी
जिल्ह्यात अद्याप सोयाबीन खरेदी सुरू झाली नसली तरी सहा हजार ४०० शेतकर्यांनी आतापर्यंत त्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा येथील केंद्रावर प्रामुख्याने ही नोंदणी करण्यात आली असली तरी मेहकर आणि मलकापूर येथील केंद्रावरच आॅनलाईन नोंदणीचा आकडा दीड हजारांच्या पुढे गेला आहे. अन्य केंद्रांवर नोंदणी करणार्या शेतकर्यांची संख्या ही अवघी ७५ ते ८२५ दरम्यान असल्याचे २९ आॅक्टोबर रोजीचा यासंदर्भातील अहवाल पाहता स्पष्ट होत आहे.
दोन हजार क्विंटल मुगाची खरेदी
मुगाची व्हीसीएमएसतंर्गत खरेदी सुरू असून मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि चिखली केंद्रावर ती आहे. मात्र गेल्या १५ दिवसांच्या काळात अवघा दोन हजार २४५ क्विंटल मूगच खरेदी केल्या गेला आहे. अवघ्या ४०९ शेतकर्यांनी त्यांच्याकडील मुगाची विक्री केली आहे तर उडीदाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. २७२ शेतकर्यांनी एक हजार ७५६ क्विंटल उडीदाची विक्री केली आहे. अवर्षणाचा फटका? साधारणत: आॅक्टोबर महिन्यात किमान आधारभूत दराने शेतकर्यांच्या माल खरेदी करणार्या या केंद्रांवर नोंदणीसह माल विक्रीसाठी शेतकर्यांची मोठी गर्दी असते. मात्र यावर्षी परिस्थिती अधिक बिकट असून अपेक्षीत अशी नोंदणी झालेली नसून खरेदीचाही टक्का कमी आहे. उडीद, मूगला अवर्षण सदृश्य स्थितीमुळे फटका बसला आहे. त्यामुळे मालाच्या प्रतवारीला फटका बसत आहे. उडीद, मुगाचे दाणेही बारिक आहेत. साधारणत: नोव्हेंबर अखेर पर्यंत केंद्रावर शेतकर्यांची गर्दी असते. मात्र वर्तमान स्थितीत चित्र मात्र वेगळे आहे.