लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसाने सध्या त्याची संततधार सुरूच ठेवली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २८.७५ टक्के अर्थात सुमारे २९ टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, असे असले तरी देऊळगाव राजा, लोणार आणि मलकापूर तालुक्यातील स्थिती तुलनेने बिकट असल्याचे चित्र आहे. असे असले तरी गत वर्षाशी तुलना करता आजपर्यंत जिल्ह्यात १३ टक्क्यांनी पाऊस जास्त पडलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना पेरणीच्या दृष्टीनेही हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकºयांची पेरण्यांची लगबग सुरू असून प्राप्त माहितीनुसार ३० टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पावसाची नोंद होते. त्याच्याशी तुलना करता जिल्ह्यात वर्तमान स्थितीत १९२ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी ही २८.७५ टक्के येते. गेल्यावर्षी सात जुलै पर्यंत जिल्हयात १०५.४ मिमी पावसाचीच नोंद झाली होती. वार्षिक सरासरीच्या तो अवघा १५.७८ टक्के होता. मात्र यंदा उशिराने आलेल्या पावसाने मात्र जिल्ह्यात आपला डेरा टाकला आहे. सार्वत्रिक स्वरुपात हा पाऊस पडत नसला तरी ज्या भागात तो पडत आहे तेथे तो दमदार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपली पेरण्याची लगबग वाढविण्यास प्राधान्य देत आहे. वर्तमान स्थितीत प्राप्त अंदाजानुसार जवळपास ४० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागातील सुत्रांचे म्हणणे आहे.प्रामुख्याने जिल्ह्यात बुलडाणा (४२.४१ टक्के), संग्रामपूर (४१.४५), खामगाव (३९.९०), जळगाव जामोद (३८.२२), चिखली (३०.०५) या पाच तालुक्यात पावसाची दमदार हजेरी आहे. अन्य तालुक्या पाऊस तुलनेने कमी असला तरी तो समाधानकारक आहे. मात्र प्रामुख्याने देऊळगाव राजा, लोणार आणि मलकापूर या तीन तालुक्यात तो अत्यंत कमी असल्याचे पावसाची आकडेवारी सांगतले. दरम्यान गेल्यावर्षी जिल्ह्यात सात जुलै पर्यंत अवघा १५.७८ टक्केच पाऊस पडला होता.बुलडाणा, संग्रामपूरमध्ये दमदारजिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरी प्रामुख्याने बुलडाणा आणि संग्रामपूर तालुक्यात या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४२.४१ टक्के पाऊस पडला आहे. बुलडाणा तालुक्यात वार्षिक ७२० मिमी पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपतांनाच ३०५.५ मिमी पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. गतवर्षी या कालावधीत अवघा १८.७० मिमी पाऊस पडला होता. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्य ४१.४५ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी अवघा दहा टक्के पाऊस या भागात जुले महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पडला होता. एकंदरीत यंदा ३१ टक्के पाऊस या तालुक्यात तुलनेने अधिक आहे.
तीन तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाजिल्ह्यात प्रामुख्याने देऊळगाव राजा तालुक्यात सरासरी अवघा १५.०६ टक्केच पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो चार मिमीने कमी आहे. लोणार आणि मलकापूर तालुक्यातही अशीच स्थिती असून येथे वार्षिक सरासरीच्या अवघा १९.२८ मिमी पाऊस पडला आहे.
सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरण्याजिल्ह्यातील साडेसात लाख हेक्टरपैकी दोन लाख २१ हजार ६४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाला आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून सरासरी ३० टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील सुत्रांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने कपाशीचा पेरा सर्वाधिक झाला असून ९६ हजार ८७८ हेक्टरवर तो आहे. त्या खालोखाल ८३ हजार १०३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा असून तूर १८ हजार ६२ हेक्टरवर आहे. गेल्या शुक्रवारच्या अहवालावर आधारीत ही आकडेवारी असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.