लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा येथून या मोहिमेस प्रारंभ होईल.भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलालजी मुथ्था पुणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जैन संघटना जलक्रांतीसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील गाव तलावांचा गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्यावतीने त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत असून, १६ फेब्रुवारी रोजी नांदुरा येथे जैन समाजाची बैठक झाली. या बैठकीत जैन संघटनेचे बुलडाणा उपजिल्हा समन्वयक प्रेम झांबड यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था हे स्वत: कंडारी येथील तलावातील गाळ काढण्याच्या उदघाटन साठी येणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला बुलडाणा कमिटी सदस्य अनिल राका, उमेश जैन, तालुका समितीचे सदस्य शांतीलाल नहार, सुभाष झांबड, आनंद संचेती, आशीष जैन, संदीप गादीया, डॉ. राजेंद्र गोठी, स्वप्नील झांबड, तालुका समन्वयक आशीष वानखडे यांची उपस्थिती होती.
कंडारी येथील तलावाची पाहणी!गाळ काढण्यासाठी नांदुरा तालुक्यातील कंडारी येथील तलावाची पाहणी जैन समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी सरपंच विशाल पाटील, बाळकृष्ण पाटील, विष्णू पाटील आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनबुलडाणा जिल्ह्यातील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय परिवहन तथा राज्य महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी उपस्थितीत राहतील.
१२0 जेसीबी, १४ पोकलॅण्ड दाखलजिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यातील नदी, नाले तसेच तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात १२0 जेसीबी आणि १४ पोकलॅण्ड सोबतच तांत्रिक मनुष्यबळ बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे.