बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू व तांदुळ वाटप करण्यात आलेले नाही. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार, निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले नाही. लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदुळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारला स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पैसे ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले. बुलडाणा शहरातील जोहर नगर, इकबाल नगर, मिर्झा नगर या परिसरातील नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांना गहू, तांदुळ स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मिळावे, यासाठी अनेक विनंत्या केल्या. परंतु त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदुळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम, तालुकाध्यक्ष हरिभाऊ उबरहंडे व तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या टेबलावर पैसे ओतले, पैसे घ्या, स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गरजू लाभार्थ्यांना दोन रुपये, तीन रुपये किलो गहू व तांदुळ धान्याचे वाटप करा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी दोन दिवसाच्या आत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले. जर नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले नाही तर तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राणा चंदन यांनी पुरवठा अधिकाºयांना दिला. या आंदोलनात गजानन गवळी, सुभाष हरमकार, वसीम बागवान, जावेद खान, मिस्कीन शाह, विजय बोराडे, गोपाल जोशी, अजगर शाह, शेख साजीद, एकनाथ उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुलडाणा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलावर ओतले पैसे; स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:46 PM
बुलडाणा : लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदुळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारला स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पैसे ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्दे लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदुळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन.नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले नाही तर तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा. गरजू लाभार्थ्यांना दोन रुपये, तीन रुपये किलो गहू व तांदुळ धान्याचे वाटप करा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली.