- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: शासनाचा ३३ कोटी वृक्षारोपणाचा उपक्रम १ जुलैपासून सुरू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ७ लाख ९३ हजार ४५० वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यानुसार दिवसाकाठी १ लाखावर वृक्षारोपण जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्याला मिळालेल्या एकूण उद्दिष्टाच्या ९.६३ टक्के वृक्षारोपण झाले आहे. वृक्षारोपण करण्यामध्ये पश्चिम विदर्भातून बुलडाणा जिल्हा ‘टॉपवर’ आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या महावृक्षारोपण अभियानात ३३ कोटींचे उद्दिष्ट आहे. ज्यामध्ये जिल्ह्याला यंदा ८२ लाख ४० हजार १५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळालेले आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी १ जुलैपासून जिल्ह्यात वृक्षारोपण सुरू झाले असून, ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेदरम्यान वन महोत्सव साजरा होत आहे. हरित चळवळ बनलेल्या या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अशासकीय, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक समूह, सहकारी संस्था, शासकीय कर्मचारी व अधिकारी इत्यादींचा सहभाग घेऊन वृक्षलागवड करण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यात ७ लाख ९३ हजार ४५० रोपांची लागवड करण्यात आली. गेल्या काही वर्षापासून सतत दुष्काळाचा सामना करीत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात वृक्षलागवडीकरिता विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वृक्षारोपणासाठी मोठे लक्ष्य ठरविण्यात आले असून, ते पुर्ण करण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातून वृक्ष लागवड मोहिमेत बुलडाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत व इतर प्रशासकीय यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्ट पुर्तीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.