बुलडाणा : आधार नोंदणीसह आधार कार्ड अद्ययावतीकरण आणि दुरूस्तीचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी आकारण्यात येणार्या शुल्क संदर्भात प्रशासनाने आधार नोंदणी व दुरूस्ती केंद्रावर दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत; मात्र अनेक केंद्रांवर दरपत्रक लावण्यात आलेले नाही, तसेच दरपत्रकानुसार शुल्क न आकारता जादा पैसे घेतले जातात. जिल्ह्यात १0५ केंद्रावर केवळ ९0 किट सुरू असून, यातील अनेक केंद्रांवर आधार दुरुस्तीच होत नाही, त्यामुळे जिल्ह्यात आधार दुरुस्तीचा गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे.अनेकांच्या आधार कार्डवर नावात चुका, जन्मतारखेत बदल, गावाचे नाव दुसरे आले, यासारख्या विविध चुका आधार कार्डवर असल्याने आधारकार्ड दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील आधार केंद्रांवर बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डात जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, निवास पत्ता, ईमेल आयडी, लिंग यांबाबतची दुरुस्ती करण्यासाठी गर्दी होत आहे; मात्र आधार नोंदणीसह आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना विविध अडचणी येत आहेत. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्याकरिता यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी १0५ महा ई-सेवा केंद्र सुरू आहेत; परंतु या केंद्रावर ९0 किटच सध्या सुरू आहेत. यातील बहुतांश केंद्रांवर आधार दुरूस्तीच करून दिल्या जात नाही. त्यामुळे ग्राहक आधार दुरुस्तीसाठी केंद्रावर गेले असता त्यांना परत पाठविण्यात येते.
आधार दुरुस्तीसाठी नवविवाहितांना अडचणडोणगाव : सध्या सर्वच ठिकाणी आधारकार्डची होत असलेली मागणी व बॅकांनी आधारवर संपूर्ण जन्मतारखेची टाकलेली अट यासाठी सेतू केंद्रावर आधार दुरुस्तीसाठी गर्दी वाढत आहे. नवविवाहित महिलांना पतीकडील नाव आधार कार्डवर आणण्यासाठी महा ई-सेवा केंद्रावर विवाह नोंदणी प्रमाणपत्राची व ऑनलाइन रहिवाशी दाखला यासह विविध कागदपत्रांची मागणी केल्या जात असल्याने आधार दुरूस्तीसाठी नवविवाहित महिलांना मोठी अडचण जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आला आहे. विवाहाची नोंद न केलेल्या व अनेक ग्रामपंचायतमध्ये अजूनही ऑनलाइन रहिवाशी दाखला दिल्या जात नसल्याने ग्राहक आधार दुरुस्तीसाठी चकरा मारुन त्रस्त झाल्याचे या स्टिंग ऑपरेशनमुळे दिसून आले. तर दुसरीकडे आधार दुरुस्तीसाठी दररोज जीपीएस लोकेशन देऊन आधार किटची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय नोंदणी सुरु होत नाही, तसेच सेतू केंद्रावर इंटरनेट सेवा नियमित सुरू राहत नसल्याने ग्राहकांना आधार कार्ड केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागते. पूर्वी आधार दुरुस्तीसाठी होत असे; परंतु आता नवीन आधारकार्ड दुरुस्तीसाठी त्या व्यक्तीच्या नावाचे चार अक्षर व जन्मवर्षाचे अंक द्यावे लागतात; पण नावाचे अक्षर न जुळल्यास आधार दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. तर एका नोंदीला २0 मिनिटे लागत असल्याने ग्राहकांना सेतू पुढे उभे रहावे लागत आहे. तर आधार दुरुस्तीसाठी मोबाइल नंबर असणे आवश्यक असल्याने आधार दुरुस्तीसाठी ग्राहकाला आपल्याजवळील जुनी आधार नोंदणी प्रत जतन करुन ठेवावी लागते. ती दाखविल्यास आधार दुरुस्ती करण्यास सोपे होते, त्यामुळे जुनी आधार नोंदणीची प्रत जतन करुन ठेवण्याचे यावेळी सेतू चालक अमोल ठाकरे यांनी सांगितले.
लोणार तालुक्यात आधार कार्ड नोंदणी, दुरूस्तीचे काम ठप्प लोणार तालुक्यात आधार कार्ड नोंदणी व दुरूस्तीचे काम काही दिवसांपासून ठप्प झाले असल्यामुळे शासनाच्या डिजिटल योजनेला आधारने निराधार केल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करण्याची यंत्रणा ठप्प झाली असल्यामुळे बँक खातेधारक, नागरिक विद्यार्थ्यांना अडचणी जात असल्याचे वास्तव सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आले. अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता नागरिकांची वणवण कायम असून, गेल्या सहा महिन्यांपासून आधार केंद्रे बंद असल्याने तालुक्यातील नागरिकांना निराश होऊन दररोज माघारी फिरावे लागत आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला असून, बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, गॅस एजन्सी, आयकर, विक्रीकर आदी खात्यांमध्ये आधार क्रमांकाशिवाय कोणतेही काम शक्य नसल्याने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा नागरिकांची व ज्यांनी यापूर्वी आधारकार्ड काढले; परंतु आता त्याचे अद्ययावतीकरण नसल्याने त्यांना पुन्हा आधार काढण्याची वेळ आली आहे. त्यातच शासनाने आधारकार्ड सेंटर महाऑनलाइनशी जोडल्यामुळे तर खासगी आधार केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शासनाकडून पुरविण्यात आलेल्या अधिकृत यंत्रावरच आधारकार्डची नोंदणी केली जात असून, एकूण मागणीचा विचार करता त्यामानाने सुरू केलेली केंद्रे अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी शहरात आधारकार्ड काढून देणार्या केंद्रांवर नागरिकांची विशेषत: महिलांची झुंबड उडाली होती. चिमुकल्यांसह वृध्दही पहाटेपासूनच रांगा लावून उभे रहात होते. प्रशासनाकडून विविध ठिकाणी आधार नोंदणीसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु लोणार येथे मागील काही महिन्यापासून आधार कार्ड नोंदणीचे काम बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे.
असे झाले स्टिंग
- - ‘लोकमत’ प्रतिनिधी बुलडाणा शहरातील विविध महा ई-सेवा केंद्रावर सोमवारला गेले. तसेच शहरातील काही बँक शाखेमध्ये आधार नोंदणी व दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होती, अशा ठिकाणी लोकमत प्रतिनिधींनी भेट दिली.
- - बँकेचा कॉम्प्रे सिस्टम्स या आधार दुरूस्ती करणार्या कंपनीशी असलेला करार संपुष्टात आल्याने आधार नोंदणी व दुरूस्ती बंद असल्याचा प्रकार येथील कॅनरा बँक शाखेत दिसून आला.
- - त्यानंतर शहरातील विविध केंद्रांवर प्रतिनिधींनी भेट दिली असता तांत्रिक कारणाने आधार प्रक्रिया बंद असल्याचे सांगण्यात आले. यातील बहुतांश केंद्रांवर आधार संदर्भात शासनाने दिलेले दरपत्रक आढळून आले नाही.
आधार नोंदणी, दुरूस्ती किंवा आधार संबंधित प्रक्रियेसाठी प्रत्येक केंद्रावर दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दरपत्रकापेक्षा जादा पैसे आकारण्यात येत असतील किंवा ज्यांच्याकडून जादा पैसे घेतले त्यांनी तक्रार करावी, संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. - सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा.