बुलडाणा : विधानसभेच्या बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी विजयाचे खाते उघडले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यावर २६ हजार ७५ मतांनी मात केली. सध्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. ऐनवेळी बंडाचा झेंडा घेऊन अपक्ष लढलेल्या भाजपच्या योगेंद्र गोडे यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. सुरुवातीला चौरंगी मानली जाणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात जवळपास दुरंगी झाली. बुलडाणा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार विजयराज शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळेस सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. यावेळेस शिवसेनेने विजयराज शिंदे यांना उमेदवारी नाकारत संजय गायकवाड यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली. तर भाजपचे योगेंद्र गोडे हे बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष रिंगणात उतरले. त्यामुळे निवडणूक चौरंगी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र खरी लढत शिवसेना व वंचित बहुजन आघाडीत झाली. शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी ६७ हजार ७८५ मते मिळवित विजयश्री खेचून आणली. दुसºया क्रमांकावर वंचित बहूजन आघाडीचे विजयराज शिंदे यांना ४१ हजार ७१० मते मिळाली. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना ३१ हजार ३१६, योगेंद्र गोडे २९ हजार ९४३, एमआयएमचे मो. सज्जाद यांना ३ हजार ७९२, अब्दूल रज्जाक अब्दूल सत्तार २ हजार ९१४ तर विजय काळे यांना ६५० मते मिळाली.
बुलडाणा निवडणूक निकाल : शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 5:46 PM