संग्रामपूर : तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथे सोमवारी सकाळी ११:३० वा. दरम्यान अचानक घराला आग लागल्यामुळे घरासह साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंब रस्त्यावर आले आहे. १६ लाख ७८ हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. वसाली येथील तेजलीबाई गणेश मोरे कुटुंबासह शेतात गेल्या असता त्यांच्या घराला अचानक आग लागली. यामध्ये घरासह इतर सर्व साहित्य भस्मसात झाले. घरी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. या आगीत सागाचे ४९ खांब, १० क्विंटल गहू, १० क्विंटल ज्वारी, ५ क्विंटल मका, १ क्विंटल भुईमूग, १ क्विंटल तूरडाळ, ५० किलो मूगडाळ, ५० किलो उडीदडाळ, २० किलो हरभरा असे धान्य जळून नष्ट झाले.
तसेच, अंथरून, कपड्यांसह २ लाख ३० हजारांची रोकड, अडीच किलो चांदी, ८० हजारांचे सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे अत्यावश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मुला- मुलींच्या शाळेतील कागदपत्रे, घरातील एलईडी टी.व्ही., लॅपटॉप, मोबाइल, शिलाई मशीन, २ कूलर, दिवान, कपाट, पलंगाची राख रांगोळी झाली आहे. घराला आग कशाने लागली हे स्पष्ट झाले नाही. अन्नधान्यासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोरे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंडळ अधिकारी राजू चामलाटे, ग्रामसेवक बी. पी. धोंडगे, तलाठी एस. ए. गाडे, सोनाळा तलाठी डी. एच. जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला. शासनस्तरावरून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब शेतात होतेतेजलीबाई गणेश मोरे यांना १४ वर्षीय बादल नामक एक मुलगा आहे. तर अंजली (वय १२ वर्षे), आरुषी गणेश मोरे (वय १० वर्षे), अमृता (वय ८ वर्षे) अशा ३ मुली आहेत. सकाळी त्या मुला -मुलींसह शेतात गेले असता अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यामुळे कुटुंब बेघर झाले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.