- विवेक चांदूरकर जळगाव जामोद - पिंपळगाव काळे सर्कलमध्ये गत एका महिन्यात दहा विद्युत रोहित्र जळाले. परंतु, निष्क्रिय अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके उध्वस्त झाले आहेत. जळालेले रोहीत्र तत्काळ लावण्याची मागणी करीत सोमवारी महावितरणच्या पिंपळगांव काळे कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
रोहीत्र जळाल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत होत्या. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेतकर्यांनी अनेकदा लेखी तक्रार दिल्या. महावितरणच्या कार्यालयात अनेकवेळा जावून पिकांचे नुकसान होत असल्याबाबत माहिती दिली. परंतु, अधिकारी जुमानत नसल्यामुळे थेट कार्यालयातच शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. रोहीत्र जळाल्यामुळे पाण्याअभावी पिके सुकत आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जोपर्यंत जाळलेले रोहित्र बसविण्यात येत नाही व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत शेतकरी कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्यांनी घेतला होता.
पिंपळगांव काळे सर्कलमधील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून देण्यात यावे किंवा नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी बांधव या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात आंदोलनकर्ते प्रकाश भिसे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भोपडे, वासुदेव भोपळे, वासुदेव चोखंडे, शाळीग्राम भोपळे, गणेश इंगळे, संपत बुंदे, अशोक ताठे, भास्कर वाघमारे, पुरुषोत्तम भोपळे, मंगेश भोपळे, गणेश बोदडे, सरपंच रविंद्र जाधव, किशोर भोपडे, वसंता बोदडे, झाल्टे, हरिदास पचपोर, विकास वाघ, स्वप्नील भोरे, भागवत झाल्टे, महेंद्र तायडे, साबीर देशमुख आदी उपस्थित होते.