सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शतकोत्तर धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासलेल्या सैलानी यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची होणारी गर्दी आणि गारपिटीमुळे बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य तापाची साथ पाहता आरोग्य विभागावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद्दयावर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सजग रहावे लागणार आहे. जैविक कचर्याचाही येथे मोठा प्रश्न आहे. त्यानुषंगाने पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून येथे निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. सैलानी बाबा यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. सर्वधर्मिय लाखो भाविक दरवर्षी सैलानी बाबांच्या मजारवर माथा टेकविण्यासाठी येतात. सात ते आठ लाख भाविकांची गर्दी लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे वातावरणात झालेला बदल पाहता साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने सजग राहण्याची गरज आहे. यात्रेत नवस बोलल्या जात असल्याने येथे पशुबळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे येथे होणारी गर्दी पाहता जैविक कचर्याचाही प्रश्न उद् भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दूषित पाण्याची समस्या सैलानी यात्रेत दुषीत पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. खासगी विहिरी व टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण केलेले नसल्यामुळे आजार उदभवू शकतात. तसा जुना अनुभव आहे. आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यावर्षी यात्रा महोत्सव मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात आहे. ऋतू बदलाचा हाच नेमका काळ आहे. त्यामुळे या बदलाचाही मानवी आरोग्यावर परिणाम होऊन रुग्णांची संख्या येथे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शौचालयाची सोय हवी! एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियानाचा नारा लावत असताना सैलानीत येणार्या भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था केलेली नसते. त्यामुळे त्यांना उघडयावरच नैसर्गिक विधी उरकावे लागतात. डोंगराच्या कडेला एकीकडे महिला तर दुसरीकडे पुरुष शौचाला बसतात. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. वातावरणात पसरलेल्या दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना यात्रा संपल्यावर पुढचा महिनाभर सहन करावा लागतो. यामधूनही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. सैलानी बाबा ट्रस्ट व प्रशासनाकडून फिरते शौचालय उभारणे आवश्यक आहे.
सैलानी यात्रेत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असून यात्रा परिसरात निर्जंतुकीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. सोबतच यात्रेत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी यात्रेत येणार्या प्रत्येक रस्त्यावरील चेक पॉईंटवर पाणीपुरवठा करणारे टँकर व वाहनांमधील पाण्याची ओटी टेस्ट करूनच यात्रेत त्यांना प्रवेश देण्यात येईल. यात्रा महोत्सवाच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज आहे.-डॉ. प्रशांत बढे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा