सिंदखेडराजा : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत सायाळा ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक तथा अनिकेत सैनिक स्कुलचे अध्यक्ष अर्जुन गवई यांनी सायाळा गावात १०० टक्के शौचालय बांधून गाव गोदरीमुक्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी षण्मुखराजन यांच्याहस्ते बुधवारला सत्कार करण्यात आला. सायाळा गाव आडवळणी मार्गावर असून तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. लोकसंख्या जेमतेम १९०० च्या जवळपास असून गाव विकासापासून कोसोदूर आहे. आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रथम ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. सरपंच रामदास अन्हाळे आणि ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून प्रथम गाव गोदरीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरात शौचालय बांधून गाव हगणदरी मुक्त केले. खा.ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी सायाळा गावासाठी १४ लाख रुपयांचा विकास निधी देवून गावात रस्ते, व्यायाम शाळा यासाठी खर्च करण्यात आला. गाव तंटामुक्त गोदरीमुक्त वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, डिजीटल शाळा यासारखे विविध उपक्रम राबवून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प अर्जुन गवई यांनी केला आहे. गावाच्या चारही बाजूने नाले वाहतात या नाल्यावर जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कट्टे बांधून पाणी साठवण करुन त्याचा उपयोग सिंचनासाठी व्हावा, म्हणून लोकवर्गणीतून नाल्याचे खोलीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव हगणदरीमुक्त केल्याबद्दल मु.का.अ.षण्मुखराजन यांनी ग्रामसेवक अर्जुन गवई यांचा सत्कार केला.
बुलडाणा : गाव गोदरीमुक्त करणाऱ्या ग्रामसेवकाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:27 PM