लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला परतीच्या प्रवासात जालना जिल्हय़ातील अंबड तालुक्यात येत असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंकुशनगरजवळ शनिवारी रात्री अपघात झाला. यामध्ये सात पोलीस कर्मचार्यांसह एक ऊसतोड कामगार असे आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील दोघांना गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे. जखमीमध्ये दोन महिला पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे.या अपघातामध्ये बुलडाणा गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी इमरान इनामदार, चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान राजेश ठाकूर, महिला कर्मचारी आशा मोरे व खिल्लारे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जालना येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एका कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. चिखली शहरातील डीपी रोडवर एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास झाली होती. २३ ऑक्टोबर २0१७ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी बीड जिल्हय़ातील गेवराई येथील एका महिलेस अटक केली होती. दरम्यान, फरार दोन महिलांच्या शोधासाठी पथक बीड जिल्हय़ामध्ये गेले होते. संबंधित आरोपी महिला न मिळाल्यामुळे एलसीबीचे पथक बुलडाण्याकडे (एमएच-२८-७२२७) वाहनाद्वारे परत येत असताना शनिवारी रात्री ११ वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्यातील अंकुशनगरजवळ कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट समोर असलेल्या ऊसतोडीच्या बैलगाडीला जाऊन धडकली. त्यात बैलगाडीचा मालक सुभाष कुराडे (रा. बळेगाव, ता. अंबड) सह वाहनातील सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ऊसामुळे गाडीची काच फुटून आतील कर्मचारी जखमी झाले आहेत. यात गाडीतील चालकासह तपास अधिकारी इमरान इनामदार गंभीर जखमी झाले. इमरान इनामदार यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दखापत झाली असून चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान राजेश ठाकूर, आशा मोरे, खिल्लारे यांनाही जबर मार लागला आहे. शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.
इनामदार यांच्यावर शस्त्रक्रियागंभीर जखमी तपास अधिकारी इमरान इनामदार यांच्यावर जालना येथील नेत्ररुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी एका डोळ्यावर शस्त्रक्रिया संध्याकाळी ४.३0 वाजेदरम्यान करण्यात आली असून, दुसर्या डोळ्यावर उशिरा रात्री शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोबतच पथकातील इतर कर्मचार्यांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.