- ब्रह्मानंद जाधव बुलढाणा - कचरा मुक्त भारत ही संकल्पना घेऊन केंद्र शासनाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान सुरू केले आहे. गावागावात विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविले जात असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेतून स्वछेतेचा संदेश दिला आहे. चिमुकल्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले, आता आपले काय? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात गावागावात सध्या स्वच्छतेचे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांचे सनियंत्रणात जिल्ह्यातील बहुतांश शाळामंध्ये शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. या द्वारे त्यांनी शौचालयाचे महत्व, वापर, कचरा विलगीकरण, स्वच्छ सुंदर गाव आदी विविध विषय मांडून कचरा मुक्त गाव म्हणजेच कचरा मुक्त भारत हा संदेश दिला. १५ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत श्रमदानं मोहीम, कुटुंब संपर्क अभियान, स्वच्छता संवाद, कचरा संकलन वर्गीकरण जनजागृती असे उपक्रम राबविले गेले आहेत. २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे व संबधीत सर्व यंत्रणा व कर्मचाऱ्यांनी स्वच्छेतेचे असेच प्रभावी संदेश देत कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.-भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा.
आता प्लास्टिक संकलनाकडे लक्षस्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत आता गावागावात पर्यावरणासाठी घातक असलेले सर्व प्लास्टिक संकलन करण्यासाठी एक दिवसीय मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे कर्मचारी, ग्रामस्थ, सहभाग नोंदविणार आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक संकलन करण्यात येईल.