बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली टक्कर दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बुलडाण्यामध्ये सातव्या फेरीनंतर प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५८२१३ मतं मिळाली असून, राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात ४०३५९ मतं पडली आहेत.
१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८ मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.५३ टक्के मतदान झालयं. यात ११ लाख १७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी ५ लाख ९ हजार १४५ मते घेत विजय साकारला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५६६ मते मिळाली होती.