नीलेश जोशी,बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यमगतीने सुरू असून ती आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीच्या २५ पैकी १४ फेऱ्या पुर्ण झाल्या असून प्रारंभपासूनच शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे. त्यांना उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर हे चांगली टक्कर देत असून उर्वरीत दहा फेऱ्यामध्ये काय उलटफेर होतो याकडे लक्ष लागून राहीले आहे.
वर्तमान स्थितीत शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांनी १३ हजार २८९ मतांची आघाडी घेतलेली आहे. त्यांना १४ व्या फेरी अखेर २ लाख १६ हजार २०१ मते मिळाली असून उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांना २ लाख २ हजार ९१२ मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी १ लाख ३८ हजार ३३९ मते घेतली आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये २६ एप्रिल रोजी अर्थात दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. त्यामध्ये ११ लाख ५ हजार ७६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी आतापर्यंत १४ फेऱ्यामध्ये ६ लाख ६३ हजार ५४० मतांची मोजणी झाली असून अद्यापही ४ लाख ४२ हरजार २२१ मते मोजणे बाकी आहे.
एकंदरीत ट्रेंड पाहता १३ ते १४ हजारांच्या आसपास शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. आता उर्वरित फेऱ्यांमध्ये मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता आश्वासकरित्या प्रतापराव जाधवांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू आहे.