लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरानाच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात गेल्या १५ महिन्यांत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात आले असून त्यावर जवळपास ५२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. परिणामी, कोरोना तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळेसह, ऑक्सिजन प्लांट, कोविड समर्पीत रुग्णालय कार्यान्वित करण्यासोबतच आनुषंगिक साहित्य खरेदीवर भर दिला गेल्याचे एकंदरीत चित्र आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी नागपूरला नमुने पाठवावे लागत होते. ऑक्सिजन उपलब्धतेची साधी सोयही नव्हती. जेथे देशाच्या जीडीपीच्या अवघा ४ टक्के खर्च हा आरोग्यवर केला जात होता. तेथे बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रावर नेमका किती खर्च होत आहे, ही बाब स्पष्ट होणे अवघड होते. त्यातून आरोग्य क्षेत्रातील पायभूत सुविधांमधील उणिवा प्रकर्षाने समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या दूरदृष्टिकोनातून कोविड हॉस्पिटलमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास चार कोटींपेक्षा अधिक खर्च करून सेंट्रल ऑक्सिजन युनिट उभारण्यात आले. सोबतच ऑक्सिजनची बुलडाण्याची गरज पाहता २० केएलचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. आता जळगाव जामोद, देऊळगाव राजा, मेहकर, शेगाव, खामगाव येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही अल्पावधीतच सुरू होत आहे. राज्यात काही ठिकाणी रुग्णालयांना शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगी पाहता बुलडाण्यातील रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग सुरळीत करण्यात आली. यासोबतच विलगीकरण कक्ष, आरटीपीसीआर लॅब, कोविड केअर सेंटरसाठी बेड, जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, ड्युरा सिलिंडर खरेदी करून जिल्ह्याच्या ऑक्सिजनच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक साठवणूक क्षमता निर्माण करण्यास प्राधान्य दिल्या गेले आहेत.
ब्लड बँकेत प्लाझ्मा काढण्याची सुविधाजिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेमध्ये प्लाझ्मा काढण्याची सुविधा नव्हती. त्यादृष्टीने येथे दुरुस्ती करून आनुषंगिक सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचालीही सध्या वेगावान झाल्या आहेत. अल्पावधीतच त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. यासोबतच शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन सेंटरही उभे राहले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात कोरोना संकटामुळे असलेल्या धावपळीसोबतच पायाभूत सुविधा निर्माणाचाही वेग वाढला आहे.