- ब्रह्मानंद जाधव
बुलढाणा - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात जोमात राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात एकाच वेळी प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर १ ऑक्टोबर रोजी एक तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात १ हजार २५५ गावांमध्ये स्वच्छतेबाबत श्रमदान करण्यात आले.
स्वच्छता ही सेवा या अभिनव मोहीमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छतेबाबत श्रमदान करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी म्हणून जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभागाने चोख नियोजन केले. श्रमदान करण्याबाबत गावपातळीवरील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. रविवारी ग्रामीण भागात सकाळपासूनच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शाळकरी मुलांचा सहभागही दिसून आला. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीअंतर्गत १ हजार २५५ गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून प्रत्येकाने आपला एका तास स्वच्छतेसाठी दिला. आतापर्यंत अनेक सार्वजनिक ठिकाण घाणीने तुंबले होते. कचरा साचला होता. त्याठिकाणीही स्वच्छतेची नांदी बघावयास मिळाली.
गाव, शहर स्वच्छतेचा जागरजिल्ह्यातील प्रत्येक गाव शहरात स्वच्छतेचा जागत बघावयास मिळाला. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एक तास स्वच्छतेच्या श्रमदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. शहरांमध्ये तहसिल, नगर पालिका मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅली काढून स्वच्छतेचा जागर केला.
कचरा मुक्त गाव, कचरा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित या अभियानात जिल्ह्यात दिवसनिहाय विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही प्रत्येक गावातून मिळत आहे. एक तास स्वच्छतेसाठी अंतर्गत प्रत्येक गावात श्रमदान करण्यात आले.-भाग्यश्री विसपुते मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा.