बुलढाणा : जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी आता जिनिंग मिल प्रमुखांनासुद्धा जिनिंग मिलमध्ये कामगंध सापळे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जिनिंग मिलमध्ये लवकरच कामगंध सापळे लावण्यात येणार आहेत.
क्रॉपसॅपमधील नियमित सर्वेक्षणांतर्गत खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर तालुक्यांमधील गावांमध्ये आर्थिक नुकसान पातळीवर आलेले असल्याने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेल्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तालुकास्तरावर वितरित करण्यात आलेल्या आपत्कालीन निविष्ठांची फवारणी गावात करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कापूस पिकाचे सर्वेक्षण करून गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
असे करा व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करताना सर्वप्रथम पीक ९० दिवसांचे होईपर्यंत दर आठवड्यात पिकांचे सर्वेक्षण करून मजुराच्या सहाय्याने डोमकळ्या वेचून अळ्यासहित नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीचे सर्वेक्षणासाठी प्रतिएकर दोन याप्रमाणे कामगंध सापळे लावण्यात यावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्यात नष्ट करावे. आवश्यकतेनुसार २० ते २५ दिवसातून सापळ्यातील ल्यूर बदलण्यात यावे.
जिनिंग मिल प्रमुखांनी मिलमध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळे, फेरामन ट्रॅप्स लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करून नष्ट करावेत. कापूस पिकाचा खोडवा किंवा फरदड पीक घेण्याचे टाळावे. फरदड घेतल्याने गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम कायम राहून या किडीचा प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते.एस. जी. डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.