नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ऐन रब्बी हंगामात शेतकर्यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्यांनी मलकापूरमधील जांबुळधाबा, चिखली तालुक्यातील केळवद येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याचे नुकसान केल्याची घटना ताजी असतानाच आता शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रती दोन शेतकरी, एक मिनी वीज रोहित्र उपलब्ध करून दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने वीज वितरण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.यासंदर्भात राज्यस्तरावर लवकरच सर्वेक्षण होत असून, एचव्हीडीएस (हाय होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) अंतर्गत त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हय़ाचा १९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे आढावा घेतला होता. त्यावेळी शासन कृषी पंपांसाठी मिनी रोहित्र देणार असून, नवीन कृषी पंप वीज जोडण्या मिनी रोहित्रावरून देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. तूर्तास हा विषय प्राथमिक स्तरावर असला तरी राज्यस्तरावर त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येऊन तशी अंमलबजावणी येत्या काळात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तूर्तास ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.बुलडाणा जिल्हय़ात गेल्या आठवडाभरापूसन खंडित वीज पुरवठय़ाने त्रस्त असलेल्या शेतकर्यांनी जांबुळधाबा आणि केळवद येथील वीज उपकेंद्रासमोर आंदोलन करीत वीज उपकेंद्रातील साहित्याची जाळपोळ केली होती. या प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे, मलकापूरचे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह जवळपास १९ जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. त्यातील दहा जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती तर आ. राहुल बोंद्रे यांची जमानतीवर सुटका करण्यात आली होती. त्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठय़ाचा प्रश्न जिल्हय़ात ऐरणीवर आला होता. त्या पृष्ठभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. यासंदर्भातील कार्यवाही सध्या प्राथमिक स्तरावर असून, राज्यस्तरावर याबाबत सर्व्हे होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीदरम्यान, १९ डिसेंबर रोजी या मुद्दय़ावर माहिती देण्यात आली होती. त्यास वीज वितरण कंपनीचे बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता जी. एम. कडाळे यांनीही दुजोरा दिला.
उच्चदाब वितरण तंत्रया तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होलटेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या र्मयादित ठेवत शेतकर्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने राज्यस्तरावर आता सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर शेतकर्यांना मिनी वीज रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याचे वीज वितरणमधील सूत्रांनी सांगितले. यामुळे वीज हानी रोखण्यास मदत मिळणार असून, कृषी पंपांनाही सुरळीत पुरवठा केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वीज रोहित्र फेल्युवर होण्याचे बुलडाणा जिल्हय़ाचे प्रमाण साडेआठ टक्के आहे.
कृषी पंप वीज जोडणी अंतिम टप्प्यातजिल्हय़ातील कृषी पंपांची वीज जोडणी अंतिम टप्प्यात आली असून, २0१६ मधील प्रलंबित वीज जोडण्या लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १९ हजार प्रलंबित असलेल्या कृषी पंपांच्या जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जून २0१८ पर्यंत सर्व प्रलंबित वीज जोडण्या दिल्या जाणार आहेत.