लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गाची तिसरी लाट जुलै ते सप्टेंबर दरम्यान येण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, प्राथमिक स्तरावर वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ३५० बेड वाढविण्यात आले असून, येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. सोबतच ऑक्सिजन बाबतही जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांसाठी ४,७१६ बेड उपलब्ध असून जिल्ह्यातील खासगी व शासकीय अशा ९४ रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये ४२६ आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनचे १५४३ बेड आहेत. यासोबतच नियमितस्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व महसूल यंत्रणेची बैठक घेण्यात येत आहे. तसेच तालुकानिहाय पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासंदर्भाने लवकरच अन्न व अैाषध प्रशासन मंत्री जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेऊन त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात अैाषधीचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता विचारात घेता आरोग्य विभाग बेड वाढविण्यासोबतच, ७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणी, अैाषधीसाठा तसेच अतिरिक्त ऑक्सिजन बेड वाढविण्यावर भर देत आहे. तूर्तास ३५० बेडचे प्राथमिक स्वरुपात नियोजन करण्यात आले असून येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्याचे प्रयोजन आहे.- प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा