- ब्रह्मानंद जाधव
लोणार : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात डिगंबर जैन मुनींची हत्या केल्याची घटना घडल्याने जैन समाजात या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. जैन मुनींच्या हत्येच्या घटनेचा लोणार येथे १४ जुलै रोजी सकल जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.
लोणार येथे सकल जैन समाजाच्या वतीने नायब तहसीलदार डोळे यांना डीगंबर जैन समाजाचे अध्यक्ष विजय संगवई, मूर्तिपूजक श्वेतांबर जैन समाजाचे अध्यक्ष शांतीलाल सिंगी, वर्धमान स्थानकवासी समाजाचे अध्यक्ष भिकमचंद डुंगरवाल, माजी अध्यक्ष गौतमचंद गेलडा, तेराहपंथ समाजाचे अध्यक्ष अनिल चोरडिया, माजी प्राचार्य भिकमचंद रेदासनी, रामचंद्र कोचर, शांतीलाल गुगलिया, शांतीलाल बोराळकर, प्रमोद भोरे यांच्या सह समाज बांधवांनी निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवला आहे. जैन समाजाच्या चातुर्मास पर्वाच्या सुरुवातीलाच काही समाज कंटकांनी जैन मुनी प.पु.आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा शांतता प्रिय समाजातील जैन साधू, साध्वींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेचा लोणारातही निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी यावेळी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात जैन समुदायातील चारही पंथामधील समाज बांधव उपस्थित होते.