विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागणी केल्यावर युवकाने पैसे न दिल्याने एका युवकासह चौघांनी युवकाला जबरदस्तीने उंदीर मारण्याचे खाऊ घातले. ही खळबळजनक घटना खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे घडली. याप्रकरणी तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी बुधवारी रात्री दोन युवती, एक महिला आणि एका युवकांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील प्रदीप प्रकाश वानखडे (२५) या युवकाच्या विरोधात दाखल असलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी करीत दोन युवती, एक महिला आणि एक युवक असे चौघेजण सोमवारी रात्री ८:३० वाजता त्याच्या घरी आले. युवकाने गुन्हा मागे घेण्यासाठी नकार दिल्याने चौघांनी चिडून जात संगनमत करून युवकाच्या तोंडात जबरदस्तीने उंदीर मारण्याचे औषध टाकले. या प्रकारानंतर युवकाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने युवकाला तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी अत्यवस्थ युवकाच्या तोंडी जबाबावरून हिवरखेड पोलिसांनी गौरव संतोष धानसाडे या युवकासह दोन युवती आणि एका महिलेविरोधात भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
परिस्थितीजन्य पुरावे आणि युवकाच्या बयाणावरून चौघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, आणखी काही बाबी तपासात स्पष्ट होतील.- कैलास चौधरी(ठाणेदार, हिवरखेड ता. खामगाव)