अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मार्च अखेर जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी, पाणी व स्वच्छता विभागातर्फे उभारण्यात आलेली शौचालये सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या शौचालयांचे फोटो अक्षांश, रेखांशसह अपलोड करण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील तब्बल १४५ गावांतील फोटो अपलोड करण्याची समस्या आता निर्माण झाली आहे. परिणामी, हा गुंता सोडवावा तरी कसा? असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण राज्यात २० जिल्हे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयांचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयांची छायाचित्रे साफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात जिल्हा पिछाडीवर असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. यामध्ये जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर आणि शेगाव या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित दहा तालुक्यांपैकी संग्रामपूर, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांच्या तुलनेत ७ तालुक्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे दिसून येते. तथापि, स्वच्छ भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचाºयांना झालेल्या मारहाणीच्या पृष्ठभूमीवर शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अनेक ठिकाणी अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे अनेक गावात प्रत्यक्ष शौचालय बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, फोटो काढणाºया कर्मचाºयांना मारहाणीच्या घटना या त्यातूनच समोर येत असल्याची चर्चा आहे, तर अनेक गावात शौचालयेच दिसून येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे.
फोटो अपलोडिंगमध्ये तांत्रिक पेच!बुलडाणा जिल्ह्यातील १२७२ पैकी तब्बल १४५ गावामधील शौचालयांची छायाचित्रे अद्याप अपलोड झालेली नाहीत. त्यातच शौचालयांचे फोटो काढण्यासाठी जाणाºया कंत्राटी कर्मचाºयांना ग्रामस्थांकडून मारहाण झाल्याची घटना पाहता, या प्रक्रीयेमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, तालुक्यातील कर्मचाºयांना घाटावरील तालुक्यातील शौचालयांची कामे देवू नये असा पवित्रा कर्मचाºयांनी घेतला आहे. शौचायल बांधकामाच्या फोटो अपलोडींगमध्ये तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे दिसून येते.