बुलडाणा: मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून बुलडाणा शहरातील कैकाडीपुरा भागात शुक्रवारी पहाटे नऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन सहा जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला हलविण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी खूनाचा प्रयत्न तथा गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही गटातील प्रत्येकी सहा अशा १२ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या घटनेच दोन्ही गटातील एकूण सहा जण जखमी झाले आहेत. यापैकी गणेश विष्णू आव्हाड याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास दुपारी अकोला येथे हलविण्यात आले आहे. अन्य जखमीमध्ये नारायण जाधव व काही महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी गणेश विष्णू आव्हाड यांच्या तक्रारीवरून सागर जाधव, प्रकाश जाधव, हरी जाधव, किसन जाधव, मुकूंद जाधव, नारायण जाधव यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, प्रकाश जाधव यांनीही या प्रकरणात तक्रार दिली असून आरोपी गणेश आव्हाड, विकी आव्हाड, सचिन शेलार, रवी आव्हाड, रंजना आव्हाड, अंजनाबाई शेलार यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केली, अशा आशयाची तक्रार दाखल केली आहे. उभय बाजूंच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही बाजूकडील प्रत्येकी सहा जणाविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या हाणामारीदरम्यान गणेश आव्हाड याला चाकू लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असून त्याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर अकोला हलविण्यात आले आहे. दोन्ही गटातील अन्य जखमीवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड. क्र. सहा आणि दोन मध्ये उपचार करण्यात येत आहेत. एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा जाधव यांचा विकी आव्हाड यांच्यावर संशय आहे. त्या कारणातून ही हाणामारी झाल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार यु. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेश यादव आणि पोलिस उपनिरीक्षक राजू नागलोत व त्यांचे सहकारी करीत आहेत.