- विवेक चांदूरकर बुलढाणा - अवैध रेती वाहतूक करणारे वाहन मंगळवारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टुणकी व करमोडा शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.
टुणकी ते लाडनापूर रस्त्यावर परमेश्वर दशरथ पडोळकार यांच्या मालकीचे एमएच- २८, बीके- २९७० क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या १ ब्रास रेती वाहतूक करण्यात येत होती. वाहनाचा पंचनामा करून पोलिस स्टेशन सोनाळा येथे जमा करण्यात आले. तसेच करमोडा फाटा येथे सकाळी ९ वाजता शिवहरी जमाव यांच्या मालकीचे विनाक्रमांकांचे ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती वाहतूक करताना सापडले. वाहनाचा पंचनामा करून वाहन पोलिस स्टेशन तामगाव येथे जमा करण्यात आले. या कार्यवाहीने तालुक्यातील रेती माफियाचे धाबे दणाणले आहेत. ही कार्यवाही तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आर.एम. चामलाटे, आर.आर. बोराखडे, तलाठी जी.के. चव्हाण, पी.एस. नलावडे, के.के. जगताप, डी.एच. जाधव, एस.एस. कुसळकर, एस.एस. रांगदळ, एस.ए. गाढे व कोतवाल झांबरे यांनी केली.