सोहम घाडगे। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अपुर्या कर्मचार्यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५ पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा योजनांची कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम हा पाणी पुरवठा योजनांबाबतीत महत्त्वाचा विभाग आहे. बुलडाणा विभागीय कार्यालयांतर्गत बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद व चिखली हे उपविभाग येतात. पाइपलाइन बांधकाम करून संबंधित यंत्रणेकडे सुपुर्द करण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते. कुशल मनुष्यबळाच्या जोरावर आजपर्यंत अनेक कामे या विभागाने पूर्ण केलेली आहेत. सद्यस्थितीत पूर्वीच्या तुलनेने कमी कामे असली तरी अनेक महत्त्वाच्या योजनांची कामे सुरू आहेत. योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी अभियंता व इतर अधिकारी, कर्मचार्यांची टीम असावी लागते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बुलडाणा विभागीय कार्यालय व अंतर्गत उपविभागीय कार्यालयातील ८0 पदे मंजूर असताना त्यापैकी ४५ पदे रिक्त आहेत.
रखडलेल्या योजनादेऊळघाट धाड पाच गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मुदत २0१४ पर्यंत होती; मात्र काम रखडले असून, आता ३१ मार्चपर्यंंत मुदत वाढवण्यात आली आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाड १३ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, शेगाव तालुक्यातील तिवान १0 गावे पाणी पुरवठा योजना, बुलडाणा शहर व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड १२ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, जळगाव जामोद १४0 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची कामेही अजून पूर्ण झालेली नाहीत.
४५ पदे रिक्तमजीप्रामध्ये शाखा अभियंता, सहायक अभियंत्यांची २२ पैकी १२ पदे रिक्त आहेत. तर कनिष्ठ लिपिकाची १३ पैकी ११, शिपाई १२ पैकी ९, वाहनचालक ५ पैकी ४, स्थ. सहायक अभियंता २, अनुरेखक २ तर शाखा अभियंता या, वरिष्ठ लिपिक, सहा. अनुरेखक, सहा. भांडार पाल व चौकीदाराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे.