बुलढाणा: जिल्हा मुख्यालयी आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून समाज बांधव बुलढाणा शहराच्या दिशेने निघाले असून पोलिसांचाही शहर परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सात वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मोर्चानंतर पुन्हा एकदा बुलढाणा शहर या मोर्चाच्या निमित्ताने आ १३ सप्टेंबर रोजी ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेने दुमदुमणार आहे. स्थानिक जिजामाता प्रेक्षागारामधून मोर्चास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातून येणारे मराठा समाजबांधव हे जिजामाता प्रेक्षागारात एकत्र येतील. तेथून या मोर्चास प्रारंभ होईल. संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल.
दरम्यान स्वयंसेवकांनी नियोजनानुसार त्यांना दिलेली निश्चित स्थळे गाठली असून १३ सप्टेंबरचा मोर्चाही एक ऐतिहासिक मोर्चा ठरणार आहे. पूर्वीप्रमाणेच स्वयंशिस्त पाळणारा हा मोर्चा रहणार असून एक आदर्श या माध्यमातून निर्माण करण्यात आलेला आहे. शहरातील चौका चौकात स्वयंसेवक एकत्र आले असून दिलेल्या नियोजनानुसार त्यांची कामे करत आहेत. जयस्तंभ चौक, संगम चौकामध्ये मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान जयस्तंभ चौकात छत्रपती शिवाजी महारांजी मुर्ती ठेवण्यात आली असून या मुर्तीचेही पुजन मोर्चात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जरांगे पाटील यांच्या कन्येचाही मोर्चात सहभाग
मराठा समाचाच्या दृष्टीने एक सामाजिक आयकॉन बनलेले मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी ही बुलढाणा येथील मोर्चाचे आकर्षण रहाणार आहे. बुलढाण्याच्या दिशेने ती निघाली असून मोर्चाला ती संबोधित करणार असल्याचीही माहिती आहे. एक ते दीड तासात ती बुलढाण्यामध्ये पोहोचणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
अशी आहे पार्किंग व्यवस्था
जिल्ह्याच्या सर्वच भागातून मोर्चेकरी येत असल्याने ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यात अजिंठा, धाड रोडवरून येणाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग राहील. घाटा खालून म्हणजे मोताळा- मलकापूर रोड ने येणाऱ्यांसाठी गुलाबचंद नगर तसेच चिखली, मेहकर वरून येणाऱ्यांसाठी जिजामाता कॉलेज प्रांगण व डीएड कॉलेजच्या प्रांगणात पार्किंगची व्यवस्था आहे. शहरातील लोकांसाठी कवीदीप हॉस्पिटल जवळ व्यवस्था आहे.