लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भूतांच्या नावाने थरथर कापणारे तरुण एका विलक्षण कार्यशाळेनंतर ढोंगी भूत अन् बुवा बाबांचे प्रकार कसे उघडे पाडतात, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी बुलडाणा येथील जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात २३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ६ या वेळेत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलडाणाच्यावतीने रविवार, २३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ६ या वेळेत शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद, बुलडाणा येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम व अंमलबजावणी समितीच्या कार्याची जाणीव युवकांना व्हावी, जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण व्हावे व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील विवेकवादी सुजाण तरुण घडावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिरात अ.भा. अंनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके, राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे, बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख अशोक घाटे मार्गदर्शन करणार आहेत. जगात भूत असते का, भानामती वस्तू गायब कशा करते, शकुन अपशकुन म्हणजे काय, आपले भविष्य आधीच ठरलेले असते का, नारळातून देवीचा खण कसा निघतो, मंत्राने यज्ञ कसा पेटतो, जादूटोणाविरोधी कायदा काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तरुण, तरुणी आणि जिज्ञासू नागरिकांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अंनिस बुलडाणा शाखेने केले आहे.
बुलडाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:54 AM