खामगाव : शेतात रानडुकराने अचानक हल्ला केल्याने शेतकरी जखमी होऊन त्यांचा हात मोडल्याची घटना ३ डिसेंबर रोजी घडली. तसेच चिचपूर परिसरात बिबट्याने बैलाची शिकार केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंप्री गवळी येथील रहिवासी किशोर होगे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दरम्यान तुरीत लपून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. यामुळे होगे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताचा असून हात फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर खामगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जंगली डुकरांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिचपूर गावाच्या चहुबाजुने जंगल आहे. त्यामुळे राही, हरिण, जंगली डुक्कर, अस्वल या प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. रोही, हरिण, जंगली डुक्कर अनेकदा पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी रात्रभर शेतात जागरण करतात. गावातील शेतकरी विनायक पोफळे यांचा बैल घरी न आल्याने त्यांनी शोध घेतला गावालत असलेल्या कदम यांच्या शेतात बिबट्याने शिकार केल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी सुद्धा गावातील शेतकरी प्रभाकर जाधव, उकर्डा शिंदे, दयाराम कदम, सिद्धेश्वर सरजने यांच्या जनावरांची बिबट्याने शिकार केली आहे.गावातील जनावरांची वन्य प्राणी शिकार करीत असल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. तसेच शेतांना कुंपण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.