लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पुण्यातील तळेगाव पिंपरी-चिंचवड येथील एका घरफोडी प्रकरणातील दीड लाखांचे सोने चोरून विकल्याप्रकरणी अटकेतील आरोपीने मलकापूर येथे मावशीच्या साह्याने सराफा व्यावसायिकास सोने विकल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मलकापुरात धाव घेतली. मलकापूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीने दाखविलेल्या सराफा व्यावसायिकास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तळेगाव एमआयडीसी परिसरात १५ नोव्हेंबर २०२० रोजी लिंग्या उर्फ अजित वेंकटेश पवार (वय ३०, रा. जेऊर अक्कलकोट, ता.सोलापूर) याने घरफोडी केली. त्यावेळी सात तोळे सोने घटनास्थळावरून लंपास केले. मलकापूर येथील महाजन विद्यालयासमोरील प्रांगणात राहणाऱ्या मावशीच्या सहकार्याने त्याने मलकापूर येथील सराफा व्यावसायिकास ते विकले होते. त्यानुसार पोलीसांनी आरोपी व त्याची मावशीच्या सांगण्यावरून पोलिसांनी संशयित सराफा व्यावसायिकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पुणे येथील पोलीस निरीक्षक रामदास इंगोले, दत्तात्रय बनसोडे, धनंजय भोसले, ज्ञानेश्वर गाडेकर यांचे पथक मलकापूर येथे दाखल झाले.