नाना हिवराळे / खामगाव(बुलडाणा) अत्यल्प पावसामुळे नापिकी होऊन शेतकर्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना आता जनावरांच्या चाराटंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे. खामगाव तालुक्यात एप्रिलअखेर उपलब्ध चारा पुरणार असल्याचे नियोजन असून, येत्या जुलैपर्यंत सुमारे २९ हजार मेट्रिक टन चार्याची तूट भासणार आहे. परिणामी तालुक्यात गुरांच्या छावण्या तसेच चारा डेपो उघडण्याची आवश्यकता असल्याची चिन्हे दिसत आहेत.खामगाव तालुक्यात एकूण १४८ गावे असून, १३२ आबाद तर १६ गावे उजाड आहेत. १९ वी पंचवार्षिक पशुगणना २0१२ नुसार तालुक्यात ७0 हजार ४७२ मोठी व १५ हजार ९२६ लहाने जनावरे व शेळ्या, मेंढय़ा ९३ हजार ८३९ असे एकूण १ लाख ८0 हजार २१७ जनावरांची संख्या आहे. टंचाई परिस्थिती सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी मोठय़ा जनावरांना दररोज ६ किलो तर लहान जनावरांना ३ किलो चार्याची आवश्यकता असते. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख २२ हजार ३ हेक्टर असून, यापैकी ७४ हजार ५0१ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखालील तर १९ हजार ५५0 हेक्टर क्षेत्र रब्बी पिकाखालील असे एकूण ९४ हजार ५१ हेक्टर क्षेत्र आहे. सन २0१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामातील अंतिम पेरणी अहवालानुसार खरीप व रब्बी हंगामातून १ लाख ८0 हजार ८७८ मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे; परंतु अपुर्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता खरीप व रब्बी हंगामातून ३0 टक्के चारा उत्पादनात घट झाल्याने १ लाख २६ हजार ६२२ मेट्रिक टन चारा उपलब्ध राहील. बांध, पडीक जमीन, कुरणे, वनक्षेत्र मिळून वैरणीचे अंदाजे १५ हजार ९७५ मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित असते.तालुक्यात १ लाख ८0 हजार २१७ पशुधनासाठी दररोज ५२६ मेट्रिक टन चारा लागत असून, एक महिन्यासाठी तो १५ हजार ८0७ मेट्रिक टन चारा लागतो. माहे ऑगस्ट २0१५ ते जुलै २0१६ या कालावधीत १ लाख ८९ हजार ६८५ मेट्रिक टनची गरज असताना २९ हजार मेट्रिक टन चार्याची तूट दिसून येत आहे. यामुळे येत्या काही दिवसात जनावरांना चारा पुरविणे कठीण होणार आहे. अगोदरच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच चार्याची तीव्रता भासणार असल्याने जनावरे कशी जगतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मे पासून चार्याची टंचाई भासणार असल्याचा अहवाल पंचायत समितीला पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठांकडे पाठविला आहे.
महिनाभरच पुरेल चारा!
By admin | Published: April 06, 2016 12:22 AM