योगेश देऊळकार, टेंभूर्णा : खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा गावामध्ये चोरट्यांनी दोन घरांमध्ये चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली. चोरट्यांनी वृद्ध पती-पत्नीला मारहाण करून लुटले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरच ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली होती.
तालुक्यातील टेंभूर्णा गावातील माणिकराव टिकार यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून घरातील दोन महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने घेतले. चोरट्यांनी १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. तसेच त्यांना धमकी देऊन डांबून ठेवले. यानंतर चोरट्यांनी गावातील शंकर लाड यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवित त्यांच्या घरात प्रवेश केला. शंकरराव लाड यांच्या पत्नी व मुलीला धमकावून त्यांच्या अंगावरील दागिने आणि कपाटातील रोख रक्कम असा एकूण ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी प्रभुदास टिकार यांच्या घरात ही चोरीचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. चोरट्यांना त्यांच्या घरात काहीच न मिळाल्याने ते गावातून पळून गेले. दरम्यान, या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सगळं सोनं घ्या, पण मारू नका...
चोरट्यांनी शंकरराव लाड यांच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. त्यासोबतच माणिकराव टिकार यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून महिलांना मारले. यावेळी महिलांनी आम्हाला मारू नका, सगळं सोनं घेऊन जा... असे म्हणत चोरट्यांना अंगावर सोनं काढून दिले. दरम्यान, चोरट्यांनी त्यांना कोंडून सकाळी सात वाजेपर्यंत आवाज करायचा नाही, अशी धमकीही दिली.रात्रीच्या गस्तीची मागणी
खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्द आणि टेंभूर्णा यामध्ये केवळ चार किलोमीटरचे अंतर आहे. असे असतानाही पोलिसांकडून रात्रीची गस्त होत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा गावात रात्रीची गस्त करण्याची मागणी केली आहे. परंतु, या मागणीकडे ठाणेदार केशव वाघ यांनी दुर्लक्ष केल्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये चोरी आणि दरोड्यांसोबतच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.